‘नजीब मुल्ला यांच्या नावावर जाऊ नका, तो कोकणी मराठी माणूस आहे’; मुख्यमंत्री शिंदेंचं भर सभेत आवाहन

185 0

ठाणे जिल्ह्यात कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळेच यंदाही ठाण्याचा गड जिंकण्यासाठी यासाठी महायुतीकडून आणि विशेषतः शिवसेने कडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. यासाठीच राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतली. यावेळी बोलताना नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस आहे. त्यांच्या नावावर जाऊ नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ठाणे जिल्हा म्हणजे महायुतीचा बालेकिल्ला आहे. स्व. आनंद दिघे यांनी कळवा- मुंब्र्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आपल्याला आपला लाडका भाऊ नजीब मुल्ला यांना मतदान करायचं आहे. नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस आहे. त्यांच्या नावावर जाऊ नका. नजीबचं चिन्ह घड्याळ आहे, तो आपला पोरगा आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी स्वतः नजीबसोबत आहोत, मग आणखी काय हवं ?… आपण एवढे वर्ष सहन केलं आता नाही करायचं. नजीब या मतदारसंघाचा विकास करेल ही जबाबदारी माझी.’

जितेंद्र आव्हाडांवर टीका

मतदारांना आवाहन केल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर विद्यमान आमदार आणि शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका देखील केली. ‘कळवा मुंब्र्यातून 3 वेळा एक ढोंग जिंकला. ठाणे मनपाकडून साडे तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र तरीही कळवा-मुंब्र्याला निधी देत नाही, अशी ओरड आताचे विद्यमान आमदार करत राहिले. त्यांच्यासाठी नजीबनेच या मतदारसंघातील घराघरात जाऊन त्यांचा प्रचार केला. मात्र आज नजीब यांना त्याचा पश्चाताप होत आहे. त्यामुळेच कळवा मुंब्रा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बंटीची घंटी वाजवून नजीब मुल्ला यांना मतदान करा’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!