रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे ?’; भाजप आमदार भीमराव केराम यांचं सभेत अजब वक्तव्य

484 0

निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये नेत्यांची बेताल वक्तव्य वारंवार पाहायला मिळतात. कधी महिलांबाबत, आणि धर्माबाबत तर कधी विरोधी पक्षाबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यात आता ‘रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे ?’, असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी केलं. विशेष म्हणजे, त्यांनी हे वक्तव्य करताना भाजप आमदार पंकजा मुंडे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. केराम हे आपल्या मतदार संघात फिरकले नाही, अशी तक्रार मतदारांकडून केली जात असल्याने त्यावरच बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली. ‘रोजरोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचं काम मी करतो. त्यासाठी खूप फिरावं लागतं’, असं केराम म्हणाले.

आता या वक्तव्यावरून केराम यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. समाज माध्यमांवर देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मारुतीच्या नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे महायुती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!