घरात एकटी असलेल्या महिलेचा तिच्याच घरात खून करून मृतदेह पलंगा खालच्या कप्प्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्नाली उमेश पवार (वय 24, रा. अष्टविनायक कॉलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या पतीने फुरसुंगी पोलिसांना कळवली. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नाली यांचे पती उमेश पवार हे मोटारचालक आहेत. ते शुक्रवारी पहाटे प्रवासी घेऊन बीडला गेले होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते घरी परतल्यावर घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. मात्र त्यांना पत्नीचा काही शोध लागला नाही. त्यावेळी त्यांना काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय आल्याने त्यांनी घरात दागिने, रोख रक्कम, पत्नीच्या मोबाईलचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तेही सापडलं नाही. त्यानंतर त्यांनी काही वस्तू पलंगाच्या खगळी ठेवलेत का हे पाहण्यासाठी पलंग उघडला. मात्र त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
पलंगाच्या आत त्यांना जखमी अवस्थेत पडलेला पत्नीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव, पोलिस उपनिरीक्षक खंदारे, विनोद पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फुरसुंगी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र हा खून कोणी केला ? का केला आणि कशासाठी केला ?, याचा तपास लागलेला नाही.