ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा! राज्याच्या राजकारणात एकच खळबळ

2907 0

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यापासून पक्षांतराच्या, बंडखोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने एका मतदार संघात चक्क भाजप उमेदवारालाच पाठिंबा दिल्याचं पत्र काढल्याने राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे.

सांगलीतील जत विधानसभा मतदार संघात भाजपने गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळत शिवसेना ठाकरे गटाने विक्रम सावंत यांना पाठिंबा देणं अपेक्षीत होतं. मात्र इथं चक्क ठाकरे गटाच्या युवा सेनेने भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक देखील काढण्यात आलं आहे.

पडळकर यांना पाठिंबा का ?

विधानसभा निवडणुकीत जतमधील युवा सेनेला काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच गोपिचंद पडळकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचं पत्रक जतचे पदाधिकारी ज्ञानेश्वर धुमाळ यांनी काढलं आहे. या पत्रकावर इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या देखील आहेत. हेच पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

जिल्हाप्रमुखांचं स्पष्टीकरण

या पत्रकानंतर जतमध्ये महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली असल्यामुळे याविषयी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत ज्ञानेश्वर धुमाळ हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत. त्याचबरोबर त्यांनी जुन्या लेटरहेडवर पाठिंबा देण्याचा हे पत्र काढलं असल्याने ते अधिकृत नाही. यामुळेच पक्षाचा लेटरहेड वापरून पक्षविरोधी पत्रक काढल्याने धुमाळ यांच्यासह इतर सहकाऱ्यांचे पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी स्पष्ट केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!