CHINCHWAD VIDHANSABHA: शरद पवार, अजित पवारांची मनधरणी फळाला; अखेर बंडखोर नाना काटेंनी घेतली माघार

119 0

विधानसभा निवडणुकांसाठी विविध मतदारसंघांमधून उमेदवारी अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी आज म्हणजेच चार नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून बंडखोरांना समजूत घालण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी बंड शमवण्यात पक्षातील वरिष्ठांना यश येत असून बऱ्याच ठिकाणी मात्र बंडखोर हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. असंच काहीसा प्रकार चिंचवड मधून बंडखोरी केलेले नाना काटे यांच्या बाबतीत सुरू आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी चक्क शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांकडूनही प्रयत्न केले जात होते. मात्र त्यासाठीच नाना काटे यांनी एक अजब अट महायुतीला घातली होती. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नाना काटे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

अर्ज मागे घेईन पण…

चिंचवड मधून भाजपचे शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून इच्छुक असलेले नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. ज्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांना बसणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हे दोन्ही युती आणि आघाडीकडून सुरु होते. मात्र आपण बंडखोरी करू नये असं वाटत असल्यास भाजपने मावळमध्ये बंडखोर बापू भेगडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा अशी अट त्यांनी घातली होती.‌

अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मावळ विधानसभेसाठी बापू भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये नाना काटे यांनी बंडखोरी न करता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुती कडून सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देत मावळमध्ये बापू भेगडेंना दिलेला पाठिंबा भाजपने काढून घ्यावा. तरच आपण अपक्ष अर्ज मागे घेऊ, अशी अट नाना काटे यांनी घातली होती. त्यामुळेच काटे यांनी थेट भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं होतं. तर दुसरीकडे नाना काटे यांचे समर्थक निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा एक तास बाकी असतानाच नाना काटे यांनी माघार जाहीर केली असून भाजपच्या शंकर जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!