विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सगळीकडेच प्रचाराची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरणार आहेत. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभा होणार आहेत. यात सभा कधी आणि कुठे होणार आहेत याबाबतची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 नोव्हेंबर पासून पुढचे पाच ते सहा दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. चार दिवसांत पंतप्रधान मोदींच्या 9 प्रचारसंभांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. या दौ-यात ते तब्बल 12 सभा घेणार असून पुण्यात देखील त्यांची सभा होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.
कधी आणि कुठे होणार सभा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 नोव्हेंबर रोजी धुळे आणि नाशिकला सभा होईल. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर या ठिकाणी सभा पार पडेल. त्यानंतर 12 नोव्हेंबरला पुणे आणि 13 नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात सभा होईल. तर त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नवी मुंबई याठिकाणी सभा होणार आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार पक्षाकडून पंतप्रधानांच्या सभांची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.