महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
नांदेड लोकसभेचे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभेची जागा सध्या रिक्त असून या जागी आता पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेस पक्षाकडून स्व. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे तर आज भारतीय जनता पार्टी कडूनही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देण्यात आलाय. काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार आणि सध्याचे उमेदवार मोहन हंबर्डे यांचे सख्खे बंधू भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नांदेड लोकसभा पोट निवडणुकीमध्ये एआयएमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.