साहित्य क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली असून राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक असून सीतायान: वेदना विद्रोहाचे रसायन ही त्यांची गाजलेली कादंबरी असून या सोबतच त्यांनी लोकसंचिताचे देणे, मातीचे रूप, स्नेहरंग, नाट्य क्रांतिकारक विष्णुदास भावे आधी पुस्तक लिहिली आहेत.
साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नक्की कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतांना महामंडळाच्या आज पुण्यात मसाप मध्ये झालेल्या बैठकीत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले
महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . यावेळी झालेल्या बैठकित तारखा निश्चित करणे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषे बाबतही चर्चा करण्यात आली .
अखिल भारतीय साहित्य महामंडळाची शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर आणि रविवार दिनांक ६ ऑक्टोबर अशी दोन दिवसीय बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना होती.
बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . या सर्व संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी झालेल्या नावांच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली . त्यानंतर भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती.
यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. महामंडळाची बैठक टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाली . शनिवारच्या बैठकीत संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, ग्रंथ दालनाचे नियोजन आदींवर चर्चा करण्यात आली आणि आजच्या बैठकीत ही रूपरेषा अंतिम करून संमेलनाध्यक्षांची निवड घोषीत करण्यात आली .