चिमुकल्यांवर अत्याचार करणारा स्कूल व्हॅनचालक न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला; कोर्टात नेमकं काय घडलं ?

272 0

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पुण्यात याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यासारखी घटना घडली. स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केलं यावेळी हा आरोपी न्यायाधीशांसमोरच ढसाढसा रडला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोर्टात काय घडलं ?

संजय जेटिंग रेड्डी ( 45, वैदूवाडी, हडपसर) असं या नराधमाचे नाव असून त्याला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं. त्यावेळी हा आरोपी न्यायाधीशांसमोर जोर जोरात रडू लागला.

 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. ‘दोन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत. त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काल गुन्हा दाखल झाला असून आरोपीला रात्री अटक केली आहे. त्यामुळे आरोपीची वैद्यकीय चाचणी करायची आहे. हा गुन्हा कुठे घडला ? का घडला आणि कधी घडला याबाबतचा तपास करायचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी’, असं सरकारी वकील म्हणाले.

त्यावर आरोपीच्या वकिलांनीदेखील युक्तिवाद केला. ‘आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असेल तर त्यासाठी एक किंवा जास्तीत जास्त दोन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे. आरोपीला मधुमेहाची समस्या आहे. त्यामुळे आरोपीला कमी कोठडी देण्यात यावी’, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज या आरोपीने ज्या स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार केले, त्याची तोडफोड केली.

Share This News
error: Content is protected !!