Beed:

जुजबी माहिती, 120 km मधले CCTV तपासले अन् घरफोडी करणारी टोळी..; पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

298 0

भर दिवसा घरफोडी करणारी टोळी, ग्रामस्थांकडून मिळालेली जुजबी माहिती, आणि तब्बल 120 किलोमीटरच्या मार्गावरील तपासलेल्या सीसीटीव्हींमुळे आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.

कसा केला तपास ?

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये दिवसाढवळ्या बंद असलेल्या घरांमध्ये चोरी होण्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने या चोऱ्या नेमक्या कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने केल्या जातात याचा तपास करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्या होत्या. दरम्यान नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून देखील सुरू होता. घटनास्थळावर तपास करत असताना नारायणगाव मधील पाटे मळा या परिसरातून कल्याणी नगर रस्त्याला दुचाकीवरून जाताना काही संशयीतांना ग्रामस्थांनी पाहिलं होतं. त्यानंतर या रस्त्यापासून ते पुढे नगर एमआयडीसी पर्यंत या चोरट्यांच्या दुचाकीचा शोध घेण्यात आला. तब्बल 120 किलोमीटर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या चोरट्यांचं ठिकाण शोधून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने या सर्व चोऱ्या केल्या. दरम्यान ग्रामीण भागात झालेल्या तब्बल 17 घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास लागला असून 19 तोळे सोन्याचे दागिने, एक दुचाकी चार मोबाईल असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनाराचीही फसवणूक

या प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून चोरी केलेले दागिने हे आपल्या आई-वडिलांचे आहेत आणि त्यांना औषधांसाठी पैशाची गरज आहे, असा बनाव करून सराफाच्या दुकानात हे दागिने गहाण ठेवले होते. जे आता पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र तब्बल 120 किलोमीटर मधील सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्याचा शोध लावल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Share This News
error: Content is protected !!