वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळेच खेडकर या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. पूजा यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अनेक धक्कादायक माहिती पूजा खेडकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना दिली आहे.
पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी युक्तिवाद करताना सुहास दिवसे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे वकिलांनी म्हटले आहे.
ॲड. माधवन हे युक्तिवाद करताना म्हणाले, ‘यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकारपरिषद घेतली जात आहे. मात्र पूजा खेडकर कधीच माध्यमांसमोर गेल्या नाहीत. यूपीएससीने हा गुन्हा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन दाखल केला आहे. सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांना त्यांच्या खोलीत बोलावून घेतले होते मात्र, पूजाने यायला नकार दिला. त्यामुळेच पूजा यांनी दिवसे यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली.’
वकिलांचा अजब सवाल
पूजा खेडकर यांचे वकील न्यायालयात असे देखील म्हणाले की ,’पूजा खेडकर या फ्रॉड नसून फायटर आहेत. त्या दिव्यांग आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. दरवेळी परीक्षा देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला ? त्या केवळ एक महिला आहेत म्हणून की दिव्यांग आहेत म्हणून ?’