वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळेच खेडकर या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या याचिकेवर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी पूजा खेडकर यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला.
वकिलांचा युक्तिवाद काय ?
पूजा खेडकर यांचे वकील माधवन हे पूजाच्या वतीने युक्तिवाद करताना म्हणाले, ‘पूजा यांच्या हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता माझी पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मग मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठीही वेळ मिळाला पाहिजे. त्यांनी माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने मला कोणत्याही क्षणी अटक
होऊ शकते त्यामुळे मी माझी बाजू मांडण्यात असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यास मला बचावाची संधी मिळेल. सर्व प्रसार माध्यमांनी माझ्या विरोधात मोहीम सुरू केली. पण मी कधीच माध्यमांशी बोलले नाही कारण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.’
वकिलांचा अजब सवाल
पूजा खेडकर यांचे वकील न्यायालयात असे देखील म्हणाले की ,’पूजा खेडकर या फ्रॉड नसून फायटर आहेत. त्या दिव्यांग आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. दरवेळी परीक्षा देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला ? त्या केवळ एक महिला आहेत म्हणून की दिव्यांग आहेत म्हणून ?’