संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. यशश्रीची हत्या तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या दाऊद शेख नावाच्या तरुणाने केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तेव्हापासून पोलीस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दाऊदचा शोध सुरू होता आणि आता अखेर काल सकाळीच दाऊदला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्याला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच काय तर त्याला हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. यशश्रीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिची हत्या केली असल्याचे दाऊदने पोलिसांना सांगितले. अटकेनंतर आज त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीकडे आणखी चौकशी करायची असून तपास देखील करायचा आहे त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उज्वल निकम सांभाळणार कायदेशीर बाजू
यशश्री शिंदे हत्याकांड्यानंतर राज्यभरात असंतोषाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांत आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. ज्येष्ठ वकील उज्वल निकम सांभाळणार कायदेशीर बाजू आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांसोबत चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे असे आयुक्तांना आम्ही सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाणार आहे. यासाठी उज्वल निकमांची आम्ही नियुक्ती केली आहे. जेणेकरून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.’