लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका भारतीय लष्करातील जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील एका तरुणाने फिर्याद नोंद केली आहे.
शत्रुघ्न तिवारी (वय २६, रा. गणेश कृपा चाळ, कल्याण, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पुण्यातील एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शत्रुघ्न तिवारी नावाच्या व्यक्तीने समाज माध्यमांवर लष्करात भरतीची संधी असल्याची जाहिरात प्रसारित केली होती. जाहिरात वाचल्यानंतर लष्करात काम करण्याची इच्छा असलेला पुण्यातील एक तरुण आरोपीच्या संपर्कात आला. त्याने आरोपीला संपर्क साधून आपल्याला लष्करात नोकरी हवी असल्याची माहिती दिली. त्यावर आरोपीने या तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची मागणी केली. या तरुणाला पैसे घेऊन ससून रुग्णालयाच्या परिसरात बोलावले. मात्र त्याचवेळी या तरुणाला संशय आल्याने त्याने तिवारीला पैसे न देता थेट त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार शत्रुघ्न तिवारी हा लष्करात जवान आहे. काही दिवसांपूर्वी लष्करातील नोकरी अर्धवट सोडून तो पसार झाला होता. त्यानंतर त्याने लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे अशी जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच तिवारी हा फसवणूक करत असल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी बंद गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार करत आहेत.