जुन्या वादातून सराईत गुंडांनी केले तरुणावर वार; पुण्यातील घटनेने शहरात खळबळ

613 0

पुणे शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणेकरांचे घराच्या बाहेर पडणे देखील गुन्हेगारांमुळे अवघड झाले आहे. सतत चर्चेत असणारी कोयता गॅंग, गाड्यांची होणारी तोडफोड, किरकोळ कारणांवरून सामान्य माणसांना मारहाण, अशा घटनांमुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यातच पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. त्यातच आता काही सराईत गुंडांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.

वैभव चंद्रकांत गंगणे (२६, रा. कसबा पेठ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या हल्ल्याप्रकरणी त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगणे आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच वादाचा राग डोक्यात ठेवून सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास गंगणे हा त्याच्या मित्राबरोबर मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना गाठले. त्यानंतर गंगणे याला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांवर वार केले. यात गंगणे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ऋषभ देवदत्त आंदेकर (२५, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार गणेश अशोक वड्डू, आयुष बिडकर (दोघे रा. नाना पेठ), जयेश लोखंडे (रा. मंगळवार पेठ), पंकज वाघमारे (रा. हडपसर) यांच्यासह 6 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे आणि वारिष्ठ पोलीस निरीक्षक भस्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. एकाला अटकही केली तर इतरांचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!