वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र पोलीस कोठडीत आपल्याला योग्यरीत्या सेवा पुरवल्या जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कारागृहातील गैरसोयींचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. त्यामुळे अटकेत असूनही खेडकर बाईंचा तोरा कमी होत नसल्याचे दिसून येत आहेत.
मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणात फरार मनोरमा यांना पोलिसांनी महाड येथून अटक केली. पहिल्यांदा न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर काल त्यांच्या कोठडी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. मात्र पोलीस कोठडीत होणाऱ्या गैरसोयीचा आणि कारागृहाच्या तक्रारींचा पाढा त्यांनी वाचून दाखवला आहे.
चहा वेळेवर नाही, जेवणही बेचव…
मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी समाप्त झाल्याने काल त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कारागृह प्रशासनातील पोलिसांवर आरोप केले. पोलीस कोठडीतील जागा ओली असते, चहा आणि जेवण वेळेवर दिले जात नाही. सकाळचा चहा नऊ वाजता दिला जातो. तर दुपारचे जेवण दीड वाजता दिले जात आहे. अशी तक्रार मनोरमा खेडकर यांनी न्यायालयासमोर बोलून दाखवले. एवढेच काय तर कारागृहात मिळणाऱ्या जेवणाला चव नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. पोलीस कोठडीत अनेक सुविधा असल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणानंतर संबंधित प्रकाराचा तपास करावा आणि कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या तक्रारींमध्ये तथ्य आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मनोरमा यांनी गोळी झाडली होती का ?
ज्या व्हिडिओमुळे मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली, त्या व्हिडिओत मनोरमा यांच्या हातात एक पिस्तूल होते. याच पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. मात्र हे पिस्तूल मनोरमा यांनी कुठून खरेदी केले ? त्याचा वापर किती वेळा केला ? याची चौकशी सुरू आहे. तर या पिस्तुलातून गोळी त्यांनी कधी गोळी झाडली आहे का ? याचा तपास करण्यासाठी हे पिस्तूल फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवण्यात येणार आहे.