वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबीयांची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. ज्यामुळे खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होत आहे. शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर हिला अटक करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर तिचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता जो सत्र न्यायालयाने मंजूर देखील केला. ज्यामुळे पोलिसांच्या चौकशीत आणि तपासात काही प्रमाणात अडचणी येत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल पुणे पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांच्या राहत्या घराची म्हणजेच बाणेर परिसरात असलेल्या बंगल्याची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.
बंगल्यात काय सापडलं ?
पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 19 जुलैला म्हणजेच शुक्रवारी खेडकर यांच्या बाणेर मधील बंगल्याची झडती घेतली. बाणेर परिसरात ओम दीप या नावाचा आलिशान बंगला आहे. याआधी जेव्हा जेव्हा पोलीस या ठिकाणी पोहोचले त्या प्रत्येक वेळेस या बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असायचे. पहिल्या वेळेस तर चक्क मनोरमा खेडकर यांनी पोलिसांसमोरच दरवाजा बंद केला होता. त्यामुळे अखेर पोलिसांनी बंगल्याच्या आत जाऊन झडती घेतली. यावेळी पोलिसांना मनोरमा यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावताना जे पिस्तूल वापरले होते, ते पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच त्यावेळी वापरण्यात आलेली लँड क्रुझर नावाची आलिशान गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर बंगल्यातील वस्तू, पुरावे यांच्याशी छेडछाड होऊ नये यासाठी बंगल्या बाहेर चतु:शृंगी पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे.