पूजा खेडकर यांनी चक्क यूपीएससीला गंडवलं; नावात बदल करून दिली 11 वेळा परीक्षा

683 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी नाव बदलून तब्बल 11 वेळा यूपीएससी परीक्षा दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीएससी परीक्षेचे अटेम्प्ट संपल्यामुळे त्यांनी नावात आणि नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करत पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पूजा खेडकर यांनी 2020 पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. तर 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत नावात बदल करून पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. यूपीएससीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांनी चक्क यूपीएससीला गंडवल्याच समोर आले आहे. यावेळी त्यांनी वडिलांच्या स्पेलिंग मध्ये बदल करत डबल इ ऐवजी डी आय लावले. ओबीसी प्रवर्गासाठी असलेले 9 अटेम्प्ट संपल्यानंतर पूजा यांनी 2020 मध्ये केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच कॅटकडे याचिका करत बहुविकलांगत्वासाठी त्यांना यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवून मिळावेत, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणं अमर्यादित संधी देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. पण कॅटने पूजा खेडकर यांची ही मागणी फेटाळली. मात्र त्यानंतरही त्यानी 2021 आणि 2022 मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. याच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची आयएएस पदी निवड झाली आहे. नावात बदल करण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. आणि प्रत्येक प्रमाणपत्र कागदपत्रावरील नाव बदलावे लागते. त्यामुळे त्यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे का ? याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहेत.

पूजा खेडकर यांचा हा नवीन प्रताप समोर आल्यामुळे आता त्यांच्या सर्व प्रमाणपत्रांची, कागदपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे. खोटे दीव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र यानंतर आता यूपीएससीची फसवणूक केल्यामुळे खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आयएएस पद धोक्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!