Beed:

पार्टीत केलं मद्यपान, दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात घेतला पोलिसांचा बळी 

1345 0

दोन दिवसांपूर्वी खडकी येथील बोपोडी अंडर पास जवळ एका भरधाव कारने धडक दिल्यामुळे रात्री गस्तेवर असलेल्या बीट मार्शल समाधान कोळी यांचा मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ केंगार याला पोलिसांनी घरून ताब्यात घेतले होते व सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या एका कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या दुचाकीला धडक दिल्याचे तपासात समोर आले आहे.

त्या रात्री आरोपीने नेमकं काय केलं ?

आरोपी सिद्धार्थ केंगार हा आपल्या मित्रांबरोबर एका मित्राच्या वाढदिवसासाठी गेला होता. इतर तीन मित्रांसह कार मधून विश्रांतवाडीतील धानोरी येथील एका हॉटेलमध्ये हे चौघेजण गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी मद्य प्राशन केले. व घरी जाण्यासाठी परत निघाले त्यावेळी सिद्धार्थ मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. खडकी परिसरात आल्यानंतर त्यांच्या कारला दुसऱ्या एका कारने ओव्हरटेक केले. त्याचा राग सिद्धार्थला आला. रागाच्या भरात त्याने भरधाव वेगात कार चालवत ओव्हरटेक केलेल्या कारचा पाठलाग केला. परंतु अंतर जास्त असल्यामुळे त्या कारला ओव्हरटेक करता येत नव्हते. त्याच्याच रागात सिद्धार्थ प्रचंड वेगात कार चालवत राहिला. त्याचवेळी बोपोडी अंडरपास जवळ भेट मार्शल समाधान कोळी आणि संजोग शिंदे यांच्या दुचाकीला कारचे जोरात धडक लागली. ही धडक एवढी तीव्र होती की कोळी उडून कारच्या काचेवर आदळून बोनेटवरुन खाली पडले. त्यामध्ये कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. शिंदे देखील बाजूला पडले होते. त्यामुळे घाबरलेल्या या चौघांनी गाडीसह तिथून पळ काढला. पुढे त्यांनी ही कार लपवली व आपापल्या घरी निघून गेले. इतका मोठा अपघात हातून घडल्यानंतरही हे चौघेजण खुशाल झोपले. मात्र पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सिद्धार्थ केंगार आणि या कार पर्यंत पोहोचले. व सध्या हे चौघेही जण पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले करीत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!