पावसाळा सुरू झाल्यापासून पुणे जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडत आहेत. मावळ मधील कार्ला- मळवली येथील पुलावरून एक तरुण वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. मागच्याच आठवड्यात पुण्यातील भुशी डॅम बॅकवॉटर मध्ये पाच जणांचे एक कुटुंब वाहून गेले होते. त्यानंतर ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीमध्ये देखील एक तरुण वाहून गेला होता. त्यातच आज पुन्हा एक तरुण वाहून गेला असल्याने मावळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मावळ मधील कार्ला- मळवली येथील ठिकाणी पूल बांधण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असून त्वरित काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र तरी देखील या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच इथे असलेल्या पर्यायी पुलाचा वापर नागरिकांना नदी ओलांडण्यासाठी करावा लागत आहे. हीच नदी ओलांडताना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एक जण या पुलावरून वाहून गेला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी बचाव कार्य देखील सुरू झाले आहे मात्र नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्यामुळे या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळेच अद्यापही वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. दरम्यान या पुलाचे काम वेळेत पूर्ण केले असते तर ही दुर्घटना टळली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया मावळ मधील नागरिक देत आहेत.