पर्यटनाला जाताय! थोडं थांबा, ‘या’ पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू; भुशी डॅममध्ये कुटुंब वाहून गेल्यानंतर प्रशासनाने लागू केले कडक नियम

1127 0

पावसाळा सुरू झाल्यामुळे विविध पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. मात्र 30 जून रोजी पुण्यातील लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. तर प्लस व्हॅली येथील पाण्याच्या कुंडामध्ये एक तरुण वाहून गेला. यामुळे पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस निर्णय घेत अनेक पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

कोणत्या पर्यटन स्थळांवर आदेश लागू ?

मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली’ (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्रात हे आदेश लागू असतील.

कोणते आदेश लागू ?

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील पर्यटन स्थळांवर एकत्र येण्यावर प्रतिबंध राहतील. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, वाहने ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस करण्यात येणार आहे.

सरकारकडून मृतांना आर्थिक मदत

भुशी डॅम मध्ये वाहून केलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एकाच वेळी या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचमुळे राज्य सरकारकडून या कुटुंबाच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. या संदर्भातली घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!