‘या’ इमारतीच्या बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा काळा पैसा वापरला, किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

101 0

मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित बांधकाम प्रकल्पात काळ्या पैशाचा वापर झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे परिवाराशी संबंधित असणारा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठं लपवून ठेवले आहे? त्याला फरार घोषीत करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे नवे आरोप केले.

किरीट सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर हे श्री जी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी याने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांना आपल्या १२ बनावट कंपन्यांचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर करून दिला. मी काही दिवसांपूर्वीच नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तीन कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे सादर केले होते. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याविषयी अद्यापपर्यंत एकही शब्द उच्चारलेला नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याबाबत मुख्यमंत्री गप्प का? चुतर्वेदीचे ठाकरेंसोबत व्यवहार आहेत. २९ कोटींचा गैरव्यवहार झाला आहे”, असा आरोप करत सोमय्या यांनी चतुर्वेदींच्या १२ कंपन्यांची यादी पत्रकारांसमोर सादर केली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

“माझ्यावर आरोप करणारे प्रवीण कुलमे कुठे आहेत ? ते देशातून बाहेर गेले का? त्यांना जितेंद्र आव्हाडांनी मदत केली का? यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार का?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत. त्यांचा एफआयआर दाखल झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत. या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले पाहिजे असे सोमय्या म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!