सोमय्या यांचा १०० कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा

486 0

मुंबई- आज दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबाशी संबंधित घोटाळा बाहेर काढणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे या कथित घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या आजच्या पत्रकार परिषदेत बोलणार का हे पाहावे लागेल.

किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास १०० कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिलं तयार करून पैसे लाटण्यात आले. आगामी काळात आम्ही किरीट सोमय्या यांचे आणखी काही घोटाळे बाहेर काढणार आहोत. त्यामुळे त्यांना आता खुलासेच बसत द्यावे लागेल. या बाबतची सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे उघडकीस आणू लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो गुन्हेगार आहे. दाऊद इब्राहिमने जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर ज्यांनी घोटाळा केला आहे, लोकभावनेशी खेळले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झाले आहेत अशांनी दुसऱ्यांच्या संदर्भात खोटे आरोप करणं बरोबर नाही. विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेला पैसा कुठे गेला, याचे उत्तर सर्वप्रथम किरीट सोमय्या यांनी द्यावे”अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. सर्व भाजपच्या नेत्यांची राष्ट्रीय भक्ती ओसंडून वाहत असते. काल सुद्धा मी पाहिलं त्यांनी पवार साहेबांबत ट्विट केले. एखादं ट्विट त्यानी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर करावं. आम्ही आता बाहेर काढणार आहोत तो टॉयलेट घोटाळा त्याबाबतही एखादं ट्विट फडणवीसांनी करावं असंही संजय राऊत म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!