मुंबई- कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाचे काम वेगवान करण्याचा सूचना केल्या. मंत्रालयातील विविध विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महासाथीची लाट सुरू असताना निवासस्थानावर होते. ज्या काही राजकीय, प्रशासकीय बैठका असतील त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेत होते. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते घरूनच राज्याचा कारभार हाकत होते. शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहण्यावर मर्यादा आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली होती. मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता.
शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या योजना, प्रकल्पांच्या लोकार्पण, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आगामी काही दिवसात आणखी सक्रिय होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. आज, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात हजेरी लावल्याने त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे.
शरद पवार म्हणाले, ” अरे वा ?”
मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात आले या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “आज आले का ?” असा प्रतिप्रश्न केला. पत्रकारांनी होकार देताच पवार उत्तरले ” अरे वा !” त्यानंतर पवार म्हणाले, ” मी अनेक राज्यात बघतो, मुख्यमंत्री घरात बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असते. वर्षावर देखील ते आहे. ते मंत्रालयात आले नाहीत म्हणून राज्याचा कारभार थांबला नाही. त्यामुळे त्याची मला चिंता नाही”