मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज जोरदार उत्तर दिलं आहे.’एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य करून आपलं मत व्यक्त करते तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांना तीन गंभीर प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना उत्तरे देत शरद पवार यांनी राज यांचा चांगलाच समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, ‘दोनच दिवसांपूर्वी मी यवतमाळ इथं केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या योगदानावर २५ मिनिटे बोललो आहे. मी दररोज सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचतो. मात्र त्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागतं. काहीजण सकाळी वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करत असतील तर त्याविषयी मी काय बोलणार? पण शाहू-फुले-आंबेडकर यांचं नाव मी भाषणांमध्ये घेतो याचा मला अभिमान आहे. कारण या तीनही महापुरुषांनी शिवछत्रपतींचे विचार पुढे नेण्याचं काम केलं आहे.’
‘शिवछत्रपतींच्या संबंधी सविस्तर वृत्त काव्याच्या माध्यमातून कुणी लिहिलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं आहे. त्यामुळे फुले, शाहु महाराज आणि आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आस्था असलेले घटक आहेत’ असे पवार म्हणाले. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होता. तेव्हाही होता आणि आता ही विरोध आहे. जेम्स लेनचं लिखाण गलिच्छ होतं. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती. माझे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत मतभेद होते आणि मला त्याचं आजही दु:ख नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
राज ठाकरे यांनी भाषणात सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले, ” परदेशी व्यक्ती भारताचा पंतप्रधान होण्यास माझा विरोध होता. मात्र नंतरच्या काळात सोनिया गांधी यांनीच आपल्याला पंतप्रधानपद स्वीकारण्यात रस नसल्याचं सांगितलं. त्यामुळे वादाचा मुद्दाच संपून केला आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांनी आपण एकत्रितपणे काम करायला हवं असं सांगितल्याने आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली” व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत. असे पवार म्हणाले.
आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत महागाईचे, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, यावर आपल्या भाषणात बोलत नाहीत अशी टीकाही शरद पवार यांनी केली. राज्यात विजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले.