नाराजी बाजूला सारून जगदीश मुळीक यांनी घेतली मुरलीधर मोहोळांची गळाभेट

489 0

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. या जागेवर नवा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचे पुढे लोकसभेचे उमेदवार कोण असणार ?, पुण्यातील लढत कोणामध्ये होणार याची देखील पुणेकरांना उत्सुकता होती. महायुतीतील अनेक नावे चर्चेत होती मात्र महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली.

 

मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील इतर इच्छुकांमध्ये मात्र नाराजीचा वातावरण पाहायला मिळाले. माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील लोकसभेच्या शर्यतीत होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जगदीश मुळीक यांनी कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली नाही. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यालयात भाजपचा सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हजेरी लावली होती यावेळीही जगदीश मुळीक गैरहजर होते. तसेच दुसऱ्या दिवशी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ फोडला यावेळीही मुळीक उपस्थित नसल्यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्टही केली होती. मात्र तरीही ही नाराजी बाजूला सारत त्यांनी आज महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची गळाभेट घेतली.

मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आज जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी मुळीक यांच्या कुटुंबीयांनी मोहोळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औक्षणही केले. यादरम्यान या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. या क्षणाची छायाचित्रे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र मुळीक यांची नाराजी खरंच दूर झाली आहे का की पक्षाची एकजूट दाखवण्यासाठी ही भेट घेतली गेली याबाबत शंका आहे. त्याचबरोबर येत्या काळात जगदीश मुळीक आपली नाराजी बाजूला सारून पक्षाबरोबरचे निष्ठा कायम ठेवत मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत प्रचार करताना पाहायला मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!