‘मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कुणावर प्रेम केलं होतं का हो ? शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

423 0

हिंगोली- शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका युवकाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? असा सवाल या युवकाने मुख्यमंत्र्यांना केला आहे.

पत्रात युवकानं म्हटलं आहे की, उद्धवसाहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेत आलात. त्यांचे प्रश्न सोडवता. माझं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं पत्रात म्हटलं आहे.

पत्रामध्ये लिहिलं आहे की, साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे. साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो? आयुष्यात कधी तरी केलं असेल उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो? मी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेतजमीन कमी असल्याने प्रेमाला विरोध असं असतं का हो? असा सवाल युवकानं पत्रातून केलाय.

तो पत्रात पुढं म्हणतो, मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमचा मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का? असं त्यानं म्हटलं आहे.

पत्रामध्ये लिहिलं आहे की, साहेब शेतकरी होऊन प्रेम करणे चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटते. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा या जगातून निघून जाणे व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही, असंही त्यानं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र साध्या कागदावर असून त्यावर कुणाचंही नाव नाही. मात्र हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एका युवकानं लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide