माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

551 0

मुंबई – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून सुटका झाली. त्यानंतर आर्थर रोड जेल येथून देशमुख यांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर केले जाणार आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी (4 एप्रिल) सीबीआयकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक जेजे रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांना सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही.

मात्र मंगळवारी (5 एप्रिल) देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले.

1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!