लखनौ- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनौमध्ये एका बदमाशाची हत्या करण्यात आली आहे. राहुल सिंग असे या बदमाशाचे नाव असून लखनऊ पोलिसांनी हसनगंज भागात चकमकीत त्याला ठार केले आहे.
राहुल सिंगवर अलीगंज ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचा आरोप होता. या दरोड्यात त्याने एका कर्मचाऱ्याची हत्या केली होती. त्याच्यावर १ लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते. राहुल सिंगला लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ४ वाजता हसनगंज परिसरात घेरले. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बंधा रोडवर झालेल्या चकमकीत राहुल सिंग जखमी झाला. त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला’
आज योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी
योगी आदित्यनाथ आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमची क्षमता सुमारे 70 हजार आहे. त्यामुळेच शपथविधी सोहळ्याला तेवढ्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्र्यांसह सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.