शेकडो बालगोपाल, हजारो तरुणाई व सेलिब्रेटींच्या उपस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाची सांगता

3396 0

पुणे : मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. शेकडो बालगोपालांसह हजारो तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. गुरूवारी रात्री 9.45 वाजता दहीहंडी फोडण्यात आली.

गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळा जवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेली विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचे वेगळेपण आधोरेखीत होत होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखीन आकर्षक करत होते. शेकडो बालगोपाल, हजारो तरूण-तरूणींनी डीजेच्या तालावर ठेका धरत मनमुराद नृत्य केले.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आरएमडी ग्रुपच्या अध्यक्षा जान्हवी धरीवाल-बालन, सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक अजय-अतुल, सिनेअभिनेते प्रवीण तरडे, ईशान्य महेश्वरी, डीजे तपेश्वरी, डीजे अखिल तालरेजा आदी कलाकार व नामवंत खेळाडू उपस्थित होते. रात्री बरोबर पावणे दहा वाजता कसबा पेठ येथील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही दहीहंडी फोडत बक्षीस आणि ट्राफी मिळविली.

यावेळी बोलताना उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, हा महोत्सव सर्वांना मनातून आनंद देणारा ठरला आहे. दहीहंडी फोडल्यानंतर हजारो तरूणांनी परत एकदा डीजेच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर दहीहंडी महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!