फॅशन हा स्त्रियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ती कोणतीही फॅशन असो.हल्ली वेगवेगळ्या हेअरस्टाइल, कलरफुल हेअर याची तरुणींमध्ये फॅशन आहे. डोक्यावरील केस हा स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे.प्रत्येक स्त्री मग ती श्रीमंत असो किंवा गरीब,तरुण असो वा प्रौढ प्रत्येकीला आपले केस प्रिय असतात.लांबसडक काळेभोर केस आपल्याला आकर्षित करतात,मानेवर रुळणारे सोनेरी केस,कुरळे केस काहींचे सौंदर्य खुलवितात. काही दशकांपूर्वी आपल्याकडे केशवपनाची चाल होती.स्त्री विधवा झाली की, तिचं केशवपन करण्यात येई. विधवा कुरूप दिसावी हा त्यामागचा उद्देश. यावरून स्त्री सौंदर्यात केसांना किती महत्त्व आहे हे लक्षात येतं. म्हणूनच केसांची निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे.
पण सध्या केसांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. लहान वयातच केस गळणे,केस पांढरे होणे,टक्कल पडणे,कोंडा होणे यांसारख्या समस्या तरुणांमध्ये वाढल्या आहेत. केसांचं आरोग्य बिघडण्यामागे वाढतं प्रदूषण, अयोग्य आहार,अति शाम्पू, केमिकल्सचा वापर ही महत्त्वाची कारणं आहेत. बऱ्याचदा जाहिरातीत दाखवली जाणारी तेल,शाम्पू आपल्याला आकर्षित करतात.चित्रपटात ,मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हेअरस्टाइल तरुणांना भुरळ घालतात.त्यामुळे हेअरडाय, हेअर केअर प्रॉडक्ट्स याचा अति वापर केला जातो. याचा परिणाम केसांवर होऊन केसांचे विकार वाढतात.म्हणून आहार आणि पोषक घटकांतून केसांची निगा कशी राखावी हे थोडक्यात पाहू.
केस आणि आहार
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर केसांचं आरोग्य अवलंबून असते. ज्यांचे शरीर सुदृढ व निकोप असते त्यांचे केस तजेलदार असतात.निकोप शरीराकरिता समतोल आहार घ्यावा लागतो. केसांसाठी प्रोटिन्स अत्यंत आवश्यक असतात.प्रोटिन्सच्या कमतरतेने केस गळण्याचं प्रमाण वाढतं.त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार म्हणजेच धान्य,हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स ए, बी, लोह,आयोडीन या घटकांची ही विशेष आवश्यकता असते.या घटकांच्या अभावाने केस राठ होतात,निस्तेज दिसतात.आणि केस पांढरे होऊन गळू लागतात. आहार समतोल ठेवला तर केसांचं आरोग्य राखता येऊ शकतं.
इतर पोषक घटक
आहाराबरोबरच बाह्य घटकांनी केसांची निगा राखता येऊ शकते. केसांना मिळणाऱ्या योग्य पोषणामुळे ते न गळता स्ट्रॉंग, जाड आणि तजेलदार होतात.केसांच्या आरोग्यासाठी चांगल्या दर्जाच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापरही करू शकतो. केसासाठी आवश्यक घटक म्हणजे तेल.तिळाचं तेल,खोबऱ्याच तेल केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आपल्या केसांच्या नैसर्गिकतेला धक्का न देता केसांना सूट होईल अशा शाम्पू, तेल हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करावा.
हे लक्षात ठेवा…
प्रखर उन्हापासून केसांना जपावे.
मोठे केस असल्यास आठवड्यातून एकदा केस धुवावे,रोज धुवू नये.त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
हेडमसाज करावा त्यामुळे रक्तपुरवठा वाढून केस गळणे थांबते.
वेगवेगळे शाम्पू, तेल,हेअरडाय यांचा वापर टाळावा.त्यापेक्षा आवळा,रिठा,शिकेकाई यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापराव्या.
रिपोर्टर (बागेश्री पारनेरकर)