विटंबना झालेल्या महाराजांच्या बंगळुरूमधील पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दुग्धाअभिषेक

477 0

बंगळुरू- काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते या पुतळ्याला दुग्धाअभिषेक करण्यात आला.

प्रफुल्ल तावरे, डॉ. घनःश्याम राव याच्यासह महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. त्याचबरोबर बंगळुरू मधील शिवप्रेमींनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद शिवगर्जना देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली. खासदार डॉ. कोल्हे यांनी मानवंदना देण्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना मानवंदना देण्यासाठी विलंब झाला. मात्र यंदा प्रथमच कर्नाटक सरकारच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाल्याचे स्थानिक शिवप्रेमींनी निदर्शनास आणून त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणे ही क्लेशदायक बाब आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकार समर्थनीय नाही. त्यामुळेच या ठिकाणी येऊन जाहीरपणे गारद (शिवगर्जना) करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यानुसार अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. तसेच या स्थानिक पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील रणधीर सेनेच्या गुंडांनी बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर जाण्याऐवजी बंगळुरू येथे जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर ऐतिहासिक गारद (शिवगर्जना) देऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा निर्णय डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह काल रात्री उशिरा बंगळुरू येथे दाखल झाले होते.

Share This News
error: Content is protected !!