‘मॅजिक फिगर’वर कोण होणार स्वार ? पुण्यात सुरू ‘पॉलिटिकल वॉर’ !

807 0

स्वबळावर लढू; ‘मॅजिक फिगर’ गाठू, महापौर बसवू : राष्ट्रवादी

राष्ट्रवादीला रोखा नाहीतर आपल्याला धोका : काँग्रेस-शिवसेना
—————————–
पुणे महापालिकेतील महाविकास आघाडी म्हणजे आघाडीतील तीनही घटक पक्षांसाठी अवघड जागेवरचं दुखणं बनलंय. “87” ची ‘मॅजिक फिगर’ काही केल्या राष्ट्रवादीला गाठून द्यायची नाही यासाठी काँग्रेस-शिवसेनेनं कंबर कसलीये. महापालिकेची सत्ता आपल्या मदतीशिवाय राष्ट्रवादीच्या पदरात पडू नये याची पुरेपूर काळजी या दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होताच राष्ट्रवादीनं ‘एकला चलो रे’ म्हणत स्वबळावर लढण्याचा नारा दिला. हा नारा कानी पडताच
गाफील असलेले काँग्रेस-शिवसेना हे दोन्ही पक्ष सावध झाले आणि आपापल्या बाह्या सावरत आमच्याशिवाय राष्ट्रवादी कशी सत्ता मिळवते ते बघतोच, असा इशारा दिला.

राष्ट्रवादी-शिवसेना एकमेकांच्या गळ्यात; काँग्रेसचं मात्र तळ्यात-मळ्यात !

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी याआधीच स्वबळाची भाषा केली असल्यानं आघाडी करायची की नाही याबाबत स्थानिक नेते मंडळींचं तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यामुळं राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी होण्याची शक्यता अधिक बळावलीये. राज्य पातळीवरचं राजकारण पाहिलं तर तिथंही राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांचं ‘मस्त चाललंय आमचं’, असंच धोरण पाहायला मिळतंय. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला कसं ‘साइड’ला ठेवलं जातं हे अनेकदा पाहायला मिळालंय. त्यामुळं एकदा पत्करलंय ना आता मग आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून पाळायचा अशी काहीशी भूमिका काँग्रेसच्या नेतृत्त्वानं घेतल्याचं दिसून येतं. राष्ट्रवादी-शिवसेनेच्या राजकीय खेळ्यांना वैतागून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाची भाषा केली असावी, असंच यावरून दिसून येतं.

काँग्रेसला 25 देऊ, शिवसेनेला 34 देऊ आणि उरलेल्या आपण घेऊ…

महाविकास आघाडीतील ज्या पक्षाला पुणे महापालिकेची एकहाती सत्ता मिळवायची असेल त्याला “87” ही ‘मॅजिक फिगर’ गाठावी लागणार आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमधील पक्षीय बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादीनं 2012 मध्ये 51 तर 2017 मध्ये 39 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला 2012 मध्ये 15 तर 2017 मध्ये 10 जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेसच्या पारड्यात 2012 मध्ये 28 तर 2017 मध्ये 10 जागा पडल्या होत्या. हे पक्षीय बलाबल पाहाता राष्ट्रवादीनं यंदा आपल्याला जास्तीत जागा कशा लढवता येतील आणि जास्तीत जागा कशा निवडून आणता येतील, अशी रणनीती आखायला सुरुवात केलीये. त्यानुसार, राष्ट्रवादीनं आपल्या पदरात 100 किंवा त्याहून अधिक जागा पाडून घेत त्या जिंकून आणायच्या आणि ‘मॅजिक फिगर’ गाठून आपलाच महापौर बसवायचा, असा प्रयत्न सुरू केलाय. समजा आघाडी झालीच तर मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबलाच्या निकषानुसार काँग्रेसला 25 आणि शिवसेनेला 34 जागा द्यायच्या आणि आपल्या पारड्यात 114 जागा पाडून घ्यायच्या, असा चंग बांधलाय. काँग्रेस-शिवसेना मात्र या आकड्यांवर समाधानी होईल, असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळं आघाडी करण्यासाठी काँग्रेसनं 35 ते 40 आणि शिवसेनेनं 40 ते 45 जागांची मागणी करत राष्ट्रवादीला कोंडीत पकडायला सुरुवात केलीये. आपल्या मदतीशिवाय राष्ट्रवादीचा महापौर होता कामा नये यासाठी काँग्रेस-शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. एकूणच काय तर मिशन “87” जो कुणी पार करेल तोच ठरेल नंबर 1..!

-संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी