पुणे- पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून भाजपने केवळ जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केल्याचा आरोप करत भाजपच्या कॉफी टेबल बुकच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेसमोर झालेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास व पुणे शहराने केलेली प्रगती जगासमोर मांडली होती. भारतीय जनता पक्षाच्या काळात तयार झालेल्या कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत. पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे असं मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना निवेदन देण्यात आले.
कॉफी टेबल बुकसाठी काढण्यात आलेल्या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.