अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात आलीये. पटेल यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेले विविध गुन्हे आणि महापालिका निवडणूक लढवताना दिलेल्या जातीच्या बनावट प्रमाणपत्राचा उल्लेख केला नसल्याचा शिवसेनेने आक्षेप उद्धव बाळासाहेब गटाकडून नोंदवण्यात आलाय.
मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 81 मधून मुरजी पटेल तर प्रभाग क्रमांक 76 मधून त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल निवडून आल्या होत्या पण या निवडणुकीत त्यांनी जातीचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर पटेल दाम्पत्याचं नगरसेवक पद रद्द झालं होतं. त्यानंतर त्यांच्या जागी दुसर्या क्रमांकाची मते मिळवलेले काँग्रेसचे नितीन सलागरे व शिवसेनेचे संदीप नाईक यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हाच दाखला देत शिवसेनेचे संदीप नाईक यांनी आता मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतलाय. पटेल यांच्यावरील दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांकडंही नाईक यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं. त्यामुळं आता मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.
नगरसेवक किंवा आमदार पद बनावट जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे रद्द झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला किमान सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.
मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द होऊन चार वर्षेही झाली नाहीत. या नियमानुसार ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.