मुंबई: शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून महाविकास आघाडीकडून ऋतूजा लटके तर भाजपाकडून मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ही विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची असून महाविकास आघाडी आणि भाजपा दोघेही आम्हीच विजयी होऊ असा दावा करत असतानाच आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठींबा देणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची आहे. मात्र आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाने उमेदवार दिला नाही. त्याबरोबरच इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नाही. मात्र भाजप ने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्ही भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे कोणत्याही पक्षाने पाठींबा दिला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.