मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

187 0

मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी (ncp) बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत.

काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी महापौर आसिफ शेख यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी या नगरसेवकांना मार्गदर्शनही केलं. तुम्ही आजपासून राष्ट्रवादीचे सैनिक झाले आहात. त्यामुळे जोमाने काम करा. राष्ट्रवादीची बदनामी होईल, पक्षाला गालबोट लागेल आणि पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका. आजपासून तुमची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. पक्षात तुमचा सन्मान होईल. तसेच तुम्हाला काम करण्याची पूर्ण मोकळीक असेल. आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो अशी तुमची भावना होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असं पवार म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले तरी या तिन्ही पक्षात पक्षवाढीसाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide