राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले आहे. बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.
संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू असून त्याने सन 2013-14 पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दीर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे 2019 ते 2020च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली.
इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील 'राष्ट्रकुल स्पर्धा २०२२' मध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र संकेत सरगर यानं वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक जिंकलं आहे.त्याच्या ह्या उल्लेखनीय कामगिरीचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे.संकेतचं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!#CommonwealthGames2022 pic.twitter.com/07qdk4ibka
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2022
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी ऊर्जामंत्री भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील संकेतचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या संकेत महादेव सरगर या सांगलीच्या सुपुत्राने राष्ट्रकूल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याने भारताच्या पदकाचे खाते उघडून देशाची मान उंचावली. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. pic.twitter.com/5UKyl6uI4T
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 30, 2022
