पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेते शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच विधानसभेत आणखी चार-पाच जण येऊ शकतात, असा दावा करण्यात आला होता. यातच आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झालेत.
हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ
हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. नाना भानगिरे शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. भानगिरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती.
पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.