Uddhav Thackeray

‘माझ्याच लोकांनी धोका दिला, म्ह्णून ही परिस्थिती उद्भवली’, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

383 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच, मला माझ्याच लोकांनी धोका दिलाय असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती तापली आहे. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आजच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठक संपताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या मंत्र्यांच्या खात्याचे विषय राहिले आहेत आहेत ते आपण पुढच्या कॅबिनेट मध्ये घेऊयात. तुम्ही जे सहकार्य केले आहे, त्याबद्दल धन्यवाद. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊयात. मागील अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केले , त्याबद्दल आभार… जर माझ्या कडून कोणाचं अपमान झाला, दुखावले असतील तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आज वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला, हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही, याबद्दल दु:ख व्यक्त केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो,” असं मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची ही अखेरची बैठक आहे का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. न्यायालयाने सांगितलं तर उद्या विश्वासदर्शक ठराव होईल. त्यानंतर कळेल ही शेवटची बैठक आहे की नाही,” असंही पाटील म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!