पुण्यातील धक्कादायक घटना ! सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा बेदम मारहाण करून खून

687 0

पुणे- सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या पार्किंगमधील गाडी काढण्याच्या वादावरून ही घटना घडली आहे.

नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३, रा आंबेगाव बु.) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज जांबू कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे , मनोज दत्तात्रेय सूर्यवंशी, विष्णू कचरू कदम (रा. नऱ्हे ) या आरोपीना अटक केली आहे.

ही घटना २६ जून रोजी रात्री घडली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून पार्किंगमधील गाडी काढण्याच्या वादातून नरेंद्र जाहीर याला बेदम मारहाण केली. नरेंद्र याच्या शरीराचे स्प्लिन या अत्यंत नाजूक अवयवावर ठोसे मारून अंतर्गत दुखापत केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला उचलून साई मोटर्स येथे ठेवून दिले. घडलेला प्रकार विष्णू कदम याने पहिला मात्र त्याने याबाबत पोलिसांना खबर दिली नाही. त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली. नरेंद्र याला वेळीच मदत मिळाली असती तर त्याचा जीव बचावला असता.

खून केल्यानंतर आरोपींनी नरेंद्र याच्या खिशातील चीजवस्तू चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी मंगळवारी साई मोटर्स येथे मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, आयपीएस रघुनाथ खैरे हे राज्याच्या पोलीस दलामधील वरिष्ठ अधिकारी आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असताना पोलीस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!