गुवाहाटी- येथील हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. आम्ही शिवसेनेतच असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत. असेही शिंदे म्हणाले.
मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच हॉटेलबाहेर येऊन माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आमचे प्रवक्ते दीपक केसरकर आमची भूमिका वेळोवेळ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. इतकंच नाहीतर बंडखोर आमदारांविषयी विचारलं असता इथे सगळे अगदी आनंदात आहेत. इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्या गटातील 20-21 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे आमदार मुंबईत आल्यानंतर पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले.
आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.