पुण्यात शिवसैनिकांकडून तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

209 0

पुणे – एकनाथ शिंदे यांच्या एबन्दानंतर शिवसेना आक्रमक झाली असून अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. पुण्यात देखील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला.

“ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

या घटनेमुळे या परिसरात वातावरण तापलं आहे. या हल्ल्यामुळे तानाजी सावंत यांच्या कार्यालय आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नेमके कोण आहेत तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी या मतदार संघाचे ते आमदार आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात राजकारण तर पुणे येथे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच ते मंत्रीपदासाठी आशादायी होते पण त्यांची ही इच्छा पूर्ण न झाल्याने ते भाजपात प्रवेश करणार अशा वावड्याही उठल्या होत्या. मात्र, ते शिवसेनेत राहिले पण अलिप्त. आता बंडाच्या दरम्यान ते पुन्हा समोर आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!