फुगेवाडी मेट्रो स्टेशनमध्ये भरविलेल्या योग विषयक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

185 0

पुणे- जागतिक योगदिनानिमित्त भारत सरकारने देशातील ७५ ऐतिहासिक विशेष ठिकाणी योगोत्सवाचे आयोजन केले होते. पुण्यामध्ये आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळी तर, पुण्यात नव्याने सुरु झालेल्या फुगेवाडी मेट्रो स्थानकावर योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, मुंबई; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे व केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय या केंद्र सरकारी विभागांसह पुणे मेट्रो या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी फुगेवाडी मेट्रो स्टेशनमध्ये भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये आयुष मंत्रालयाने तयार केलेला सामान्य योग अभ्यासक्रम त्यातील आसनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. पवनमुक्तासन, उत्तानपादासन, भुजंगासन, मद्रासन, अर्धचक्रासन, ताडासन अशी सोपी परंतु अत्यंत लाभदायी आसने यामध्ये येतात. यासोबतच योग व त्याचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या भारतीय योग गुरूची माहिती या प्रदर्शनात आहे. तिरुमलाई, कृष्णपार्थ, स्वामी शिवानंद. के. पट्टाभी जॉईस, जग्गी वासुदेव, योगगुरू भारत भूषण, विक्रम चौधरी तसेच महान योग गुरु बी के एस. आयंगार, जे पुण्यामधूनच आपले कार्य करत होते, यासर्वांचा उल्लेख इथे करण्यात आला आहे.

‘योग ‘चे महत्त्व योग करण्यास प्रेरणा देणारी घोषवाक्ये इलेस्ट्रेशनच्या आकर्षक चित्रांमधून येथे योगविषयक माहिती दिली गेली आहे. हे प्रदर्शन उद्या २३ जून पर्यंत सर्व नागरिकांना पाहता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!