फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन, मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

402 0

पुणे- आगामी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्रचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सकाळी साडेसहा वाजता तीन दिवसीय योग व योगगुरुंबद्दल माहिती देणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर 6.40 ते 7.00 वाजेपर्यंत म्हैसूर, कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित नागरिकांसाठी करण्यात येईल. त्यानंतर 7.00 ते 7.45 या वेळेत सामान्य योग सत्र म्हणजेच नियमित सोपे योग सत्र घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहू शकतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे पारलेवार यांनी यावेळी सांगितले.

वाहनतळ, प्रवेश व तिकीट मजला तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्लाटफॉर्म अशा तीन मजल्यांवर 21 जून रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सहभागी नागरिकांसह योग सराव/प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व नागरिकांसाठी योगा मॅट, सात्विक अल्पोपहार याची व्यावस्था राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी दिली.

या उत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि मेट्रोचे काम देखील पाहावे, असे आवाहन पुणे मेट्रोचे अधिकारी मनोजकुमार डॅनियल यांनी यावेळी केले. प्रथम येणाऱ्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि परत असा मोफत प्रवास दिला जाईल. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने हा मोफत प्रवास प्रायोजित केला आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

याशिवाय सह्याद्री हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमातील सर्व सहभागींसाठी मोफत एका वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांचे भाषण आणि सामान्य योगाभ्यास देखील शहरातील विविध ठिकाणी एलईडी प्रोजेक्टरद्वारे थेट स्क्रीनिंग केले जाईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!