मोठी बातमी! पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

4050 0

पुणे- पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांचा साथीदार राहुल खुडे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवलेवाडी येथील जमीन आपल्यालाच विकावी यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या दोघांवर आरोप आहे.

विष्णू हरिहर भाजपाचे माजी नगरसेवक असून ते प्रभाग क्रमांक 28 महात्मा फुले- भवानी पेठ या प्रभागातून निवडून आले होते. पोलिसांनी हरिहर यांचा साथीदार खुडे यांच्याकडून दोन पिस्तुलेही जप्त केली असून या दोघांचे अंडरवर्ल्ड गँगस्टर अरुण गवळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विष्णू हरिहर, राहुल दत्ताराम खुडे (वय ३८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), प्रेम शाम क्षीरसागर (वय १८, रा. पर्वती दर्शन) व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबतची माहिती अशी की, येवलेवाडी येथे सादीक सलीम खोजा यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवर काही व्यावसायिक प्रकल्प उभा करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमुळे त्यांना हा प्रकल्प सुरु करता आला नाही. २०२१ मध्ये विष्णू हरिहर व राहुल खुडे त्यांच्याकडे आले व ती जमीन त्यांना पाहिजे असल्याचे सांगितले. योग्य भाव दिल्यास व्यवहार करु असे बोलणे झाले. त्यानंतर ती जागा हरिहर यांनाच विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू लागले.

त्यानंतर २७ मे रोजी सॅलिसबरी पार्कमधील गोल्डन बेकरीसमोर विष्णु हरिहर व इतर साथीदार लाठ्या, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी खोजा यांचे मित्र नसीर अन्सारी यांना दमदाटी करुन त्यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर १ जून रोजी फिर्यादी खोजा यांना राहुल खुडे याने फोन करून येवलेवाडी येथील जमिनीचा व्यवहार विष्णु हरिहर बरोबर कर. नाही तर गोळ्या घालून मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणावरून विष्णू हरिहर आणि राहुल खुडेंच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!