नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाकघरातील खर्च काहीसा कमी होणार आहे. शातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत. पाम, सूर्यफुल आणि सोयाबीन या कंपन्यांनी तेलाच्या किंमतीत प्रति लिटर 20 रुपयांची कपात केली आहे.
ही कपात सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. किचन बजेटमध्ये गृहिणींना आणि हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे. आज तेल दरात कपात जाहीर करण्यात आली असली तरी येत्या एक दोन आठवडयात नवीन दराचे फायदे सर्वसामान्यांना मिळतील. इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे. ब्रँडेड खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मात्र, प्रिमियम खाद्यतेल ब्रँडच्या किमती कमी व्हायला काहीसा वेळ लागेल. खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे परिणामी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारात होऊन महागाईत घट होण्याची अपेक्षा आहे.
प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज यांच्यासह जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. मदर डेअरी कंपनीनं दिल्लीमधील आपल्या खाद्यतेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी कमी केल्या आहेत. मदर कंपनीनं त्यांच्या ‘धारा’ या ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किंमतीत कपात केली आहे. आता धारा कंपनीच्या एक लिटर मोहरीच्या तेलाची किंमत 208 रुपयांवरून 193 रुपये प्रति लीटर झाली आहे.