अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. मागील वर्षी देखील आव्हाड यांनी अशाच पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छांना उत्तर देताना अण्णांनी आव्हाडांना सणसणीत उत्तर दिले आहे.
अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा.’
प्रिय अण्णा….
प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था,वाढती सामाजिक दरी,चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता#HappyBirthdayAnna pic.twitter.com/vYuBjKQJfL— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2021
मागील वर्षी शुभेच्छा देताना आव्हाड यांनी चीनच्या विषयात लक्ष घालावे अशी सूचना करून उपरोधिक शुभेच्छा दिल्या होत्या. आव्हाडांच्या या शुभेच्छांवर अण्णांनी दिलेले उत्तर आव्हाडांना निरुत्तर करणारे ठरले. अण्णा म्हणाले, ” तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय? असा सवाल अण्णा हजारेंनी केला.
अण्णा पुढे म्हणतात “मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो. पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केले? प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावे का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करीत नाही?, असे सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित करत आव्हाडांना शुभेच्छांवर सणसणीत उत्तर दिलं आहे.