पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.
अंकुश काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याचा आम्हाला आनंद आहे, पण या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना मात्र भाषण करण्यास परवानगी दिली. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपचा होता का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या विभागाचे खासदार श्रीरंग बारणे तसेच आमदार सुनील शेळके यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील दिले नव्हते, तर दुसरीकडे कोथरूड मतदार संघाच्या आमदाराला व्यासपीठावर बसण्याची संधी दिली. हे सर्व नियम सोडून झाले असून वारकरी संप्रदायाचा हा कार्यक्रम असताना भारतीय जनता पक्षाने त्याला पक्षीय स्वरूप दिले हे योग्य नाही. याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो असे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे.