अजितदादांना भाषण नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या

380 0

पुणे- देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज देहूच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठाव उपस्थित असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचे खुद्द पंतप्रधान मोदींनाच आश्चर्य वाटले.

कार्यक्रम सुरू असताना भाषणासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यानंतर खुद्द मोदी यांनीही अजित पवार यांच्याकडे हात दाखवून भाषणासाठी विचारणा केली. मात्र आपण भाषण करा असा अजित पवार यांनी सुचवले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. “पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर अन्याय करण्यात आला आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत याचे भान प्रधानमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी राजकारण करत असाल तर वारकरी सापम्प्रदाय आणि महाराष्ट्राची जनता कधीच खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आपला निषेध नोंदवला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!